किमयागार

अगदी कालपरवापर्यंत राज्यातील विविध पक्षांचे राजकीय नेते, राजकीय पंडित, पत्रकार, प्रज्ञावंत, साहित्यिक, कलाकार आणि सर्वसामान्य जनता अशा सर्वांचे  गृहीतक होते की, महाराष्ट्रात कोणी कितीही मोठा मुरब्बी, लोकप्रिय राजकीय नेता असला तरी त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे होता येणे अशक्य आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनी व त्यानंतरच्या सत्तांतराने हे गृहीतक साफ खोठे ठरवले. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील चमत्कारीक खेळीने देवेंद्रजींच्या निवडणूक नियोजनाचा नवा वस्तूपाठ स्थापन केला तर सत्तांतराने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वकौशल्यावर शिक्कामोर्तब केले आणि ज्याप्रमाणे उत्कंठावर्धक क्रिकेट सामन्यात अनपेक्षित निकाल लागावा त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री जाहीर केले. या क्षणाला राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस या नावाने आपला दबदबा निर्माण केला.

दूरदृष्टी

राजकीय क्षेत्रात काम करताना दूरदृष्टी हवी. कारण, समस्त जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने ध्येयधोरणे ठरवली जातात. त्याचा परिणाम दुरगामी होतो. दळण वळण, आरोग्य, शिक्षण, शेती यासारख्या मूलभूत गरजा, उपजीविका यांच्या संबंधित ध्येय धोरणे ठरवताना धोरण कर्त्यांमध्ये दूरदृष्टी हवी. कारण ते सामान्य जनतेच्या जीवन मरणाशी संबंधित असतात. त्यामुळे अभ्यासू नेतृत्व असले तर खऱ्या अर्थाने विकासाचे चक्र फिरू लागते. याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा चौफेर अभ्यास सर्वपक्षीय नेते, पत्रकार मान्य करतात.
जलयुक्त शिवार सारखी योजना असो वा आपले सरकार या डिजिटल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून सामान्य जनतेचा थेट मंत्रालयाशी अत्यंत पारदर्शी संपर्क असो प्रत्येक ठिकाणी देवेंद्रजींची दूरदृष्टी अनुभवास येते.

राजकीय नेतृत्व कोणत्याही पक्षाचे असले तरी ते आर्थिक बाबतीत तज्ञ नसले तरी किमान आर्थिक साक्षर तरी असले पाहिजे. परंतु अर्थसंकल्प हा विषय अजूनही अनेकांना डोईजड वाटतो. परंतु देवेंद्रजी यांचा या विषयात हातखंडा असल्याचे मान्यच करावे लागते. अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा याविषयी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारे पुस्तकच त्यांनी लिहिले आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे. याबाबतीत नागपूरचे डॉ. श्रीकांत जिचकार यांची प्रकर्षाने आठवण होते. सर्व महाराष्ट्र त्यांना Most qualified Person म्हणून ओळखायचा.

संसदीय कार्य

भारताने संसदिय लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली. जनतेच्या हिताचे कायदे करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कायदेमंडळाच्या सदस्याना विविध प्रकारची आयुधे उपलब्ध असतात. प्रत्येक विधिमंडळाच्या सदस्यानी जनतेच्या व्यापक हितासाठी या संसदीय आयुधांचा वेळोवेळी वापर करावा अशी अपेक्षा असते. विधेयके, तारांकित प्रश्न, प्रश्नोत्तरे, आकडेवारी याबाबत देवेंद्रजींचे कौशल्य अक्षरश: अचंबित करणारे आहे. कदाचित म्हणूनच अनेकांना देवेंद्रजी विरोधी पक्षनेत्यापेक्षा सत्ताधारी म्हणूनच बरे वाटतात.

पक्षसंघटनेवर मजबूत पकड

राष्ट्रहीत सर्वोच्च स्थानी त्यानंतर देश व नंतर स्वतः अशी विचारांची पक्की बैठक असलेल्या भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशा विविध महत्वाच्या पदावर त्यांनी कार्य केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडली असल्याने प्रत्येकाला देवेंद्रजी आपलेसे वाटतात. प्रचारात आधुनिक तंत्रज्ञान वापरासंबंधीचा आग्रह असो वा निवडणूक काळात वार रूम ची यशस्वी यंत्रणा असो किंवा घोषणापत्र या सर्व बाबतीत देवेंद्रजींच्या सक्षम नेतृत्वाची छाप दिसून येते.

राज्यातील सत्तांतर

राज्यातील 2019 च्या निवडणूकीत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपने 106 विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त केला. राज्यात भाजप आणि शिवसेना युतीने बहुमताचा आकडा पार केला परंतु शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाशी नाते तोडत जनतेने नाकारलेल्या कॉँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत अनैसर्गिक युती केली. यावेळी देवेंद्रजीनी गर्जून सांगितले की, मी पुन्हा येईन. त्यावेळी त्यांच्या या गर्जनेची खिल्ली उडवली गेली मात्र देवेंद्रजीनी आपली गर्जना वास्तवात उतरवली आणि सगळ्या विरोधकांना सणसणीत चपराक हाणली. महाविकास आघाडी कडे जिंकण्यासाठी आवश्यक संख्या असतानाही शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि केवळ देवेंद्रजींच्या कौशल्याने भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. त्याहीपेक्षा रंगतदार निवडणुक विधानपरिषदेची होती. कॉँग्रेसच्या प्रथम पसंतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीची बिघाडी चव्हाट्यावर आली.भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देवेंद्रजींच्या निवडणूक कौशल्याचे जाहीर रित्या कौतुक केले
अन त्याच रात्र अनैसर्गिक आघाडीला कंटाळलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी उठाव केला अन तब्बल अठरा आमदार सुरत येथे पोहोचले. तेथून गुवाहाटी पर्यंतचा प्रवास सर्वाना माहित आहेच. पुढे हा आकडा 50 पर्यंत पोहोचला अन अखेर अपेक्षेप्रमाणे राज्य सरकार गडगडले. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेता, प्रतोद यांच्या नियुक्ती अन त्यांचे अधिकार या सर्वांचा खूप उहापोह झाला. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला अभ्यासाला पूरक असे हे प्रात्यक्षिक होते. या सर्व घडामोडीतून देवेंद्रजींचे संयमी वक्तृत्व आणि कौशल्ययुक्त नेतृत्व सर्व देशाने अनुभवले. सर्वात मोठा धक्का तर पुढे होता. या घडामोडीवर लक्ष ठेवून असणाऱ्या प्रत्येकाला हीच अपेक्षा होती की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार, परंतु पत्रकार परिषदेत जेव्हा देवेंद्रजीनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले तेव्हा सर्वानाच आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला व स्वतः सत्तेबाहेर राहून नव्या सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व पक्षाध्यक्ष जे पी नड्डा जी यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. पक्षाचा कार्यकर्ता होणे म्हणजे काय असते याचा आदर्श देवेंद्रजीनी आपल्या आचरणातून दाखवून दिला.

आज भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता देवेंद्रजी मध्ये पक्षाचे व देशाचे सुद्धा उज्ज्वल भविष्य पाहत आहे. त्यांचा सारखा वक्ता दशसहस्त्रेशू, चौफेर अभ्यासू, विकासाची दूरदृष्टी व सर्वात महत्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांशी आणि सामान्य जनतेशी नाळ जोडलेली असणारा नेता राज्यात विकासाची गंगा आणनारा किमयागार आहे. भारतीय जनता पक्षाचे अंत्योदयाचा विचार
देवेंद्रजीच्या नेतृत्वकौशल्याने नक्कीच प्रत्यक्षात येईल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. परमवैभवं नेतूमेतत स्वराष्ट्रम् या ध्येयमार्गावर अव्याहत चालणाऱ्या देवेंद्रजीना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा!